श्रेणियाँ
Loading...
मौसम...
Logo

Up India live TV news

ब्रेकिंग
जळगांव

उपवर्गीकरणाविरोधात ऐतिहासिक एल्गार; मंचावरून दिग्गज नेत्यांचा सरकारला थेट इशारा

20 Oct 2026, 04:37 PM (IST)
जळगाव (प्रतिनिधी): अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात आज 4 ऑक्टोबर रविवार रोजी जळगावात ऐतिहासिक जन आक्रोश महामोर्चा काढण्यात आला. शिवतीर्थ मैदान, कोर्ट चौक येथून निघालेल्या या मोर्चात हजारो भीमसैनिक सहभागी झाले होते. आरक्षण उपवर्गीकरण विरोधी लोक संघर्ष समिती, जळगाव जिल्ह्याच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चामुळे जळगाव शहरातील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला होता, तसेच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.



आम्ही खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे-भानुदास विसावे
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे म्हणाले, "मी चर्मकार समाजाचा असून आज बहुसंख्य समाज खांद्याला खांदा लावून तुमच्याबरोबर आला आहे. आई-वडिलांनंतर जर दुसरा कोणी बाप असेल तर त्याचं नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहे."पुढे ते म्हणाले, "आम्ही पेटून उठलो आहोत. आम्ही खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे. आमची लढाई समाजाशी नाही, सरकारशी आहे. पहिला मोर्चा आम्ही मुंबईला काढला, मंत्रालयाजवळ रस्ता जाम केला. उद्या जर आम्ही मंत्रालयात घुसलो तर तुम्हाला खुर्चीवर शांत बसू देणार नाही."



पेपर फुटतो, नोकरी दुसऱ्यांला मिळते-आनंदराज आंबेडकर
मंचावरून बोलताना रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर म्हणाले, "देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये असं होत नाही की जो पेपर फुटत नाही. अत्यंत पद्धतशीरपणे पेपर फोडला जातो. तो प्रश्न तुम्हाला आणि मला भेटत नाही, तो दुसऱ्याला मिळतो."ही परिस्थिती बदलायची असेल तर सर्वांना एकत्र येण्याची काळाची गरज आहे. आज आपण जर एकत्र आलो नाही तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही."त्यांनी कोल्हापूर-सोलापूरच्या विद्यार्थ्यांची व्यथा मांडली की, "20 ते 30 वयातील विद्यार्थ्यांना विद्यापीठात शिकू दिलं जात नाही." तसेच ते म्हणाले, "आमच्या काळात आमची घरं कच्ची होती पण इमान पक्कं होतं. आज घरं मोठी झाली पण चळवळीशी असलेलं इमान कमी होतंय."



मातंग समाज हा आपला छोटा भाऊ आहे-चंद्रकांत हंडोरे!
आरक्षण उपवर्गीकरण विरोधात बोलताना सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी समाजात फूट पाडणाऱ्यांवर हल्ला चढवला. ते म्हणाले, "हा डाव त्यांच्या डोक्यात आहे. मतं त्यांना मिळाली पाहिजे, ही त्यांची भूमिका आहे. अशा डावाला आपण बळी पडू नये."मातंग समाज आपला छोटा भाऊ आहे, चर्मकार समाज आपला भाऊ आहे. बाबासाहेबांनी सांगितलं होतं - सर्व समाज आहे, सर्व अर्थानं हरलेला समाज आहे. या समाजाला पुढं घेऊन जायला पाहिजे. मोठा भाऊ म्हणून आपल्याला ही भूमिका अदा करायची आहे."सोशल मीडियावर बाबासाहेबांबद्दल होणाऱ्या टीकेवर त्यांनी नाराजी व्यक्त करत म्हटले की, "तुम्ही आम्हाला शिव्या द्या, परंतु डॉ. बाबासाहेबांच्या नावाला वेडंवाकडं Comments करू नका."



ही विसरणारी औलाद नाही-दीपक केदार
यावेळी ऑल इंडिया पँथर्स सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, "केंद्रातील नरेंद्र मोदीच्या सरकारच्या काळात आरक्षणाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. नोकऱ्यांमध्ये बॅकलॉग, अनुशेष भरला जात नाही. सरकार केवळ उप-वर्गीकरण असा विषय पुढे करत आहे. ज्या वेळी आरक्षण लागू झाले तेव्हा उप-वर्गीकरण कुठे होते?"

"ही विसरणारी औलाद नाही, हे लक्षात ठेवा. हा बाबासाहेबांचा प्रश्न आहे. आरक्षण वाचवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. मातंग समाजाच्या आंदोलनाच्या पत्रावर बोलताना ते म्हणाले की, त्या पत्रात 2027 ला बघू असे लिहिले आहे.

अ, ब, क, ड वर्गीकरण केलं तर सरकारला समुद्रात बुडवू-प्रा जोगेद्र कवाडे!
शेवटच्या भाषणात पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे सर यांनी एल्गार पुकारला. ते म्हणाले, "हा वर्गीकरणाचा डाव आपल्याला ओळखायला हवा. हा निर्णय यापुढे या राज्यामध्ये कदापि होऊ देणार नाही."हा फुले, शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये अ, ब, क, ड वर्गीकरण करण्याचा प्रयत्न जर सरकारने केला, तर सरकारला समुद्रामध्ये बुडवल्याशिवाय राहणार नाही."बाबासाहेबांनी जीवाचं रान केलं, रक्ताचं पाणी केलं. त्यांनी केलेलं कष्ट आम्ही वाया जाऊ देणार नाही," असेही ते शेवटी म्हणाले.

यावेळी जळगाव जिल्हा संघर्ष समिती, समस्त आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, विविध संघटना, पक्षांचे जिल्हा व तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.